
प्रतिनिधी|जालना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत सन २०२४-२५ या वर्षात जालना जिल्ह्यात मंजूर झालेल्या ५१८० वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात तात्काळ निधी जमा करावा, अशी मागणी इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय समिती जालना यांच्या अध्यक्षतेखाली दि. ०५/०१/२०२४, २९/०१/२०२४ व १४/०२/२०२४ रोजी बैठका पार पडल्या होत्या. समितीने घेतलेल्या निर्णयानुसार दि. १६/०२/२०२४ रोजी वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर सदर प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता.

सन २०२४-२५ या वर्षाकरिता जालना जिल्ह्यातील ५१८० लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे. प्रति लाभार्थी रु. १.२० लाख या प्रमाणे एकूण रु. ६२,१६,००,००० (बासष्ट कोटी सोळा लाख) तर ४ टक्के प्रशासकीय निधी म्हणून रु. २,४८,६४,००० (दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख चौसष्ट हजार) अशी एकूण रु. ६४,६४,६४,००० (चौसष्ट कोटी चौसष्ट लाख चौसष्ट हजार) निधीस शासन मान्यता देण्यात आली होती. यापैकी तात्पुरता रु. २.५० कोटी निधी वितरित करण्याचे आदेशही देण्यात आले होते.
मात्र, दि. २६ सप्टेंबर २०२४ रोजी शासन निर्णय प्रसिद्ध होऊनही अद्यापपर्यंत संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा झालेला नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी घरकुल बांधकामापासून वंचित राहिले असून त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ दखल घेऊन मंजूर निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे जालना जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम राठोड यांनी निवेदनाद्वारे केली होती






