जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरुड येथे NMMS स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यान विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना वर्गशिक्षक सावता तांबेकर. छायाचित्र : दिव्य मराठवाडा
गिरीराज गिराम |जालना (मुख्य संपादक दिव्य मराठवाडा)
जालना तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरुड, केंद्र वखारी येथे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या (NMMS) स्पर्धा परीक्षेची नियोजनबद्ध व तंत्रज्ञानाधिष्ठित तयारी यशस्वीरीत्या राबविण्यात आली आहे.ही परीक्षा रविवार दि 28 डिसेंबर 2025 ला होणार आहे.ही तयारी एप्रिल 2024 पासून आजपर्यंत सातत्याने घेण्यात आली असून विद्यार्थ्यांकडून प्रत्येक पाठावरील सविस्तर प्रश्नोत्तरे सोडवून घेण्यात आली. यासोबतच एकूण 20 सराव प्रश्नपत्रिका प्रत्येकी 90 गुणांच्या सोडवून घेण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, प्रश्न सोडविण्याची गती व अचूकता लक्षणीयरीत्या वाढली आहे.या उपक्रमात डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. मोबाईल, प्रोजेक्टर, डिजिटल प्रश्नपत्रिका, ऑनलाइन शैक्षणिक साहित्य, व्हिडिओ स्पष्टीकरण, तसेच डिजिटल टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या आधुनिक पद्धतींची ओळख करून देणे,
हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.या संपूर्ण उपक्रमासाठी लागणारा सर्व शैक्षणिक व इतर खर्च प्राथमिक पदवीधर व वर्गशिक्षक सावता भरतराव तांबेकर यांनी स्वखर्चातून केला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेल्या या उपक्रमाचे पालक, ग्रामस्थ व शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होत आहे.या उपक्रमास गटशिक्षणाधिकारी मनोज कोल्हे, शिक्षणविस्तारअधिकारी श्रीमती नाकाडे मॅडम, तसेच केंद्रप्रमुख लक्ष्मण देशमुख यांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. शाळेतील इतर सहकारी शिक्षकांचेही या उपक्रमास सहकार्य लाभले.NMMS परीक्षेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी व त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सक्षम व्हावा, यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
NMMS स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचा सर्वांगीण विकास करून भविष्यातील शिक्षणासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत मिळावी हाच या पाठीमागचा उदात्त हेतू होता. आणि ही सुवर्णसंधी सेवेच्या अखंड सेवेच्या सोळा वर्षानंतर मला मिळाली याचा आम्हाला आनंद आहे मला विश्वास आहे की नक्कीच विद्यार्थी या परिषदेत परीक्षेमध्ये यश संपादन करतील.