
प्रतिनिधी| जालना
वारसा हक्काने फेरफार नोंद घेऊन फाईल मंडळाधिकाऱ्याकडे पाठवण्यासाठी लाच मागणाऱ्या ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ला.प्र.वि.) यशस्वी सापळा कारवाई केली आहे. सिंधी काळेगाव सजा येथील तलाठी गजानन मनसाराम बारवाल (वय ३६) याला ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
तक्रारदार पुरुष (वय ४२) यांचे वडील मयत झाल्यानंतर वडिलोपार्जित शेतीच्या वारसा हक्काने फेरफार नोंदीसाठी त्यांनी २७ जानेवारी २०२६ रोजी सर्व कागदपत्रे तलाठी कार्यालयात सादर केली होती. मात्र संबंधित तलाठ्याने या कामासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या अनुषंगाने २८ जानेवारी २०२६ रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यावेळी तलाठ्याने ५ हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत ३ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर त्याच दिवशी रुपनगर, जालना येथे मनोज वाघमारे यांच्या घरातील भाडेतत्त्वावरील गाळ्यासमोर रोडवर सापळा कारवाई राबवण्यात आली. पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तलाठ्याने तक्रारदाराकडून ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्याला ताब्यात घेतले.
आंगझडतीदरम्यान आरोपीकडून लाच रक्कम ३ हजार रुपये, वैयक्तिक खर्चाची ३,१२० रुपये रक्कम तसेच एक वन-प्लस मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याचे विश्लेषण सुरू आहे. आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया देखील चालू आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन तालुका जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कोमल शिंदे करत आहेत. सदर कारवाई पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. मार्गदर्शन पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजू तळेकर यांनी केले.






