HomeNewsशतकापलीकडील आयुष्याचा शांत अंत : पाटील बाबा अंनतात विलीन.

शतकापलीकडील आयुष्याचा शांत अंत : पाटील बाबा अंनतात विलीन.

‘पाटील बाबा’ काळाच्या पडद्याआड

प्रतिनिधी | सिंधी काळेगाव

जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथील ज्येष्ठ, श्रद्धावान, समाजप्रिय आणि आदर्श जीवन जगलेले व्यक्तिमत्त्व पाटीलबा बाळाजी गिराम यांचे शुक्रवारी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ११५ वर्षे होते. त्यांच्या दीर्घायुषी, संयमी व धर्मनिष्ठ जीवनाचा अंत झाल्याने संपूर्ण सिंधी काळेगाव गावावर शोककळा पसरली असून गावाने आपला एक वडीलधारा मार्गदर्शक गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
पाटीलबा गिराम यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे. शुक्रवारी त्यांच्या शेतात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.अंत्ययात्रेदरम्यान गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सिंधी काळेगाव येथील श्री मारोती मंदिर संस्थानच्या कार्यात त्यांचे योगदान अतुलनीय होते. संस्थानची देखरेख, स्वच्छता, व्यवस्थापन तसेच धार्मिक परंपरा जपण्याचे कार्य त्यांनी अनेक वर्षे प्रामाणिकपणे केले. मंदिरातील धार्मिक कार्यक्रम सुरळीत पार पडावेत यासाठी ते सदैव तत्पर असत. संस्थानच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे मानले जात होते.दररोज नित्यनियमाने सायंकाळी हरीपाठ, भजन, कीर्तन तसेच दिवाळीत काकडा यांसारख्या धार्मिक उपक्रमांत ते मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने सहभागी होत असत. वाढत्या वयालाही न जुमानता त्यांची भक्ती, शिस्त आणि सकारात्मकता तरुणांसाठी प्रेरणादायी होती.साधी राहणी, स्पष्ट विचारसरणी, परोपकारी स्वभाव आणि धार्मिक निष्ठा यांमुळे ते गावात प्रेमाने “पाटील बाबा” म्हणून ओळखले जात होते. गावातील अनेक वादविवादात त्यांनी शांततेचा आणि सलोख्याचा मार्ग दाखवला.त्यांच्या निधनाने धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीही भरून न निघणारी आहे.पाटीलबा बाळाजी गिराम यांना दिव्य मराठवाडा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

RELATED ARTICLES

Most Popular