
प्रतिनिधी|जालना.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत कम्बाईन हार्वेस्टर, ट्रॅक्टर व ट्रॅक्टरची विविध अवजारे यांचे वितरण प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये उत्साहात पार पडले.
या वितरण सोहळ्यास माननीय पंकजाताई मुंडे (पालकमंत्री), आमदार अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी अमिषा मित्तल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे तसेच कृषी विभागातील अन्य वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रांची प्रत्यक्ष वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, शेती यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन उत्पादनक्षमता वाढते. वेळेवर शेती कामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. शासन शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
माननीय आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून शेती अधिक सक्षम व फायदेशीर करावी, असे आवाहन केले. जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांनी कृषी यांत्रिकीकरणामुळे ग्रामीण भागातील शेती अधिक आधुनिक व स्पर्धात्मक होत असल्याचे सांगितले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी योजनेची सविस्तर माहिती देत सांगितले की, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानाच्या माध्यमातून अत्याधुनिक कृषी यंत्रे उपलब्ध करून दिली जात असून, याचा थेट फायदा शेती उत्पादन व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी होत आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी लाभार्थी शेतकऱ्यांनी शासनाचे व कृषी विभागाचे आभार मानले. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले






