Homeशैक्षणिकआजचा तरुण हा उद्याचा सक्षम नागरिक असून त्याने सामाजिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे...

आजचा तरुण हा उद्याचा सक्षम नागरिक असून त्याने सामाजिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे – जिजाताई जाधव

सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचा प्रेरणादायी समारोप.

प्रतिनिधी|जालना

लोकमान्य टिळक महाविद्यालय,सेवली येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत शंभू सावरगाव येथे आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचा प्रेरणादायी समारोप गुरुवारी (दि. 22 जानेवारी 2026) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.दिनांक 16 जानेवारी 2026 ते 22 जानेवारी 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या या शिबिराची मुख्य संकल्पना “शाश्वत विकासासाठी तरुणांचा सहभाग” अशी होती.समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाई प्रतिष्ठानचे सचिव उकाजी जाधव हे होते.प्रमुख अतिथी म्हणून जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा जिजाताई जाधव,संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.सुरेंद्र जाधव, श्री क्षेत्र शंभू महादेव संस्थानचे मठाधिपती परमपूज्य बालक गिरी महाराज तसेच लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एल.चाटसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.अध्यक्षीय भाषणात उकाजी जाधव यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांना समाजाभिमुख, कर्तव्यदक्ष व संवेदनशील बनविणारी एक प्रभावी चळवळ असल्याचे सांगितले. तरुणांनी केवळ शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता समाजातील समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी,असे त्यांनी आवाहन केले.

जलसंधारण,पर्यावरण संरक्षण व सामाजिक एकोपा या बाबी शाश्वत विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी नमूद केले.प्रमुख अतिथी जिजाताई जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजचा तरुण हा उद्याचा सक्षम नागरिक असून त्याने सामाजिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे.” स्वयंसेवकांनी राबविलेले अंधश्रद्धा निर्मूलन,स्वच्छता व जलसंधारण यांसारखे उपक्रम समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणतात. अशा उपक्रमांतून तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती, सेवाभाव व सामाजिक जाणीव निर्माण होते, असे त्यांनी स्पष्ट केले.संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. सुरेंद्र जाधव यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संघभावना व सामाजिक बांधिलकी विकसित होत असल्याचे सांगितले. “पाणी अडवा – पाणी जिरवा” ही संकल्पना केवळ घोषवाक्य न राहता ती प्रत्येकाने कृतीत उतरवली पाहिजे,असे त्यांनी ठामपणे नमूद केले.परमपूज्य बालक गिरी महाराज यांनी अध्यात्मिक व सामाजिक मूल्यांचे महत्त्व विशद करत सेवा, त्याग व श्रम यांच्या माध्यमातूनच समाजाची खरी प्रगती साधता येते, असे प्रतिपादन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केलेल्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.या सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वयंसेविका तसेच कार्यक्रमाधिकारी यांनी विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविले.

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृती, पाणी अडवा – पाणी जिरवा अंतर्गत जलसंधारणाची कामे, स्वच्छता मोहिमा, पर्यावरण संवर्धन, ग्रामजागृती व सामाजिक प्रबोधन अशा असंख्य मोहिमांचा समावेश होता.या उपक्रमांना शंभू सावरगाव येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वयंसेवकांच्या श्रमदानामुळे गावात स्वच्छता व जलव्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण झाली. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, सेवाभाव, नेतृत्वगुण व स्वयंशिस्त विकसित झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले.कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकाऱ्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांचे,प्राचार्यांचे,ग्रामस्थांचे तसेच स्वयंसेवक व स्वयंसेविकांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

Most Popular