प्रतिनिधी|जालना

जालना तालुक्यातील सेवली येथे अप्पर तहसिल कार्यालय मंजूर करण्यात यावे, या मागणीसाठी सेवली सह परीसरातील नागरिकांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील अनेक दिवसांपासून शासनाकडे निवेदने, अर्ज आणि पाठपुरावा करूनही मागणीची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी धडक मोर्चा काढण्याची तयारी केली आहे.
जालना तालुक्यात अप्पर तहसिल कार्यालय मंजूर झाले आहे.हे कार्यालय सेवली येथे करण्याच्या साठी ग्रामस्थ आग्रही आहे. या पार्श्वभूमीवर सेवली परिसरातील नागरिकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले असून मागील तीन दिवसांपासून सेवली बंद पाळण्यात येत आहे. व्यापारी, ग्रामस्थ व विविध संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला आहे.तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बुधवार दि. ३० एप्रिल रोजी दुपारी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे सेवली मंडळातील नागरिकांच्या वतीने धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये सेवली, सोनेदेव, परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी, व्यापारी, युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती सरपंच गजानन ढाकणे यांनी दिली. शासनाने तातडीने निर्णय घेऊन सेवली येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, या आंदोलनाची प्रत पालकमंत्री पंकजाताई मुंडे, पोलीस अधीक्षक जालना तसेच तालुका पोलीस स्टेशन यांनाही देण्यात आली आहे. सेवलीच्या मागणीबाबत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






