HomeNewsजिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाचा विजय; शेतकऱ्याची मुलगी शिवानी गिराम पहिल्याच प्रयत्नात पोलिस.

जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाचा विजय; शेतकऱ्याची मुलगी शिवानी गिराम पहिल्याच प्रयत्नात पोलिस.

सिंधी काळेगावात महिलांकडून जंगी सत्कार; युवतींसाठी ठरली प्रेरणास्थान

गिरीराज गिराम |जालना

जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथील शिवानी गिराम हिने वयाच्या २१ व्या वर्षी आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर पहिल्याच प्रयत्नात पोलिस भरतीत यश मिळवत मोठी कामगिरी बजावली आहे. अत्यंत साध्या शेतकरी कुटुंबातून आलेली शिवानी आज पोलिस दलात पहिल्याच प्रयत्नात सामील होत गावाचे नाव उज्ज्वल करणारी मुलगी ठरली आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान गावातील महिलांनी शिवानीचा जंगी सत्कार करून अभिनंदन केले आहे


सिंधी काळेगाव येथील शिवानीचा जन्म एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात झाला. वडिलांकडे केवळ 3 एकर शेती असून त्यावरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आर्थिक अडचणी, मर्यादित सुविधा आणि ग्रामीण भागातील अनेक अडथळ्यांचा सामना करताना शिवानीने कधीही आपल्या स्वप्नांपासून माघार घेतली नाही. शिक्षणाबरोबरच तिने पोलिस भरतीसाठी आवश्यक असलेल्या शारीरिक तयारीवरही विशेष लक्ष दिले. रोज सकाळ-संध्याकाळ कठोर सराव, धावणे, व्यायाम आणि अभ्यास यांचा समतोल साधत तिने स्वतःला सक्षम केले.शिवानीच्या या उल्लेखनीय यशानंतर गावातील महिलांनी तिचा जंगी सत्कार करून तिच्या कष्टांचे कौतुक केले.

या सत्कार सोहळ्यात गावातील अनेक महिला, युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवानीच्या यशाने प्रभावित होऊन अनेक युवतींनी तिचा आदर्श घेऊन पोलिस भरतीसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामीण भागातील मुलींनाही मोठी स्वप्ने पाहता येतात आणि ती पूर्णही करता येतात, हे शिवानीने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.शिवानीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, गुरुजन आणि मार्गदर्शकांना दिले आहे. परिस्थिती कशीही असली तरी चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते, असा प्रेरणादायी संदेश तिने दिला. तिच्या या यशामुळे केवळ तिच्या कुटुंबाचा नव्हे, तर संपूर्ण सिंधी काळेगावचा गौरव वाढला असून, ती आज अनेक तरुण-तरुणींसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.शिवानी गिरामचे हे यश ग्रामीण भागातील मुलींसाठी आशेचा किरण ठरत असून, शिक्षण आणि करिअरच्या क्षेत्रात पुढे जाण्याची नवी उमेद देणारे आहे. तिच्या या कर्तृत्वामुळे “मुलगी शिकली, प्रगती झाली” हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.यावेळी रमेश गिराम, शिवाजी गिराम,आसाराम गिराम,संजय गिराम ,नारायन गिराम,रामभाऊ गिराम,भगवान खर्जूले,जानकिराम गिराम, परमेश्वर कोरधने सह महिलांची उपस्थिती मोठी होती.

RELATED ARTICLES

Most Popular