
प्रतिनिधी|जालना
पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून आणि केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मला सीतारमन यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सादर झालेला २०२६–२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प हा “विकसित भारत 2047” या संकल्पनेचा भक्कम पाया असल्याचे प्रतिपादन भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी केले. या अर्थसंकल्पाचे त्यांनी स्वागत करत केंद्र सरकारचे अभिनंदन केले.
आमदार लोणीकर म्हणाले की, हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा दस्तऐवज नसून शेतकरी, कामगार, युवक, महिला, मध्यमवर्ग आणि उद्योजक अशा समाजातील सर्व घटकांच्या आशा-आकांक्षांना बळ देणारा आहे. देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे, ऊर्जा सुरक्षेला अधिक बळकटी देणे आणि आर्थिक स्थैर्य राखत विकासाचा वेग वाढवणे, या बाबी या अर्थसंकल्पात ठळकपणे दिसून येतात.
कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, AI-आधारित सेवा, सिंचन सुविधा, साठवणूक व्यवस्था आणि बाजारपेठ अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, तसेच ग्रामीण भारत अधिक समृद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तरुणांसाठी स्टार्टअप्स, MSME, कौशल्य विकास आणि सेमीकंडक्टर मिशनसारख्या योजनांमुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळेल आणि हा अर्थसंकल्प ‘हाताला काम आणि डोक्याला दिशा’ देणारा ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
रस्ते, रेल्वे, लॉजिस्टिक्स, जलमार्ग, शहरे आणि ग्रामीण भागात विकासाचा वेग वाढवण्यासाठी इतिहासातील सर्वाधिक भांडवली खर्च करण्यात आल्याचे आमदार लोणीकर यांनी नमूद केले. या गुंतवणुकीचा थेट लाभ महाराष्ट्रासह मराठवाडा विभागालाही होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिला उद्योजक, स्वयं-सहायता गट, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या विशेष तरतुदींमुळे महिला सशक्तीकरणाला अधिक बळ मिळेल आणि ‘नारी शक्ती = राष्ट्र शक्ती’ हा विश्वास अधिक दृढ होईल, असे त्यांनी सांगितले.करप्रणाली सुलभ करणे, आर्थिक स्थैर्य राखणे आणि महागाई नियंत्रणावर भर देत सामान्य नागरिकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे आमदार लोणीकर म्हणाले. हा अर्थसंकल्प राजकीय घोषणांचा नसून काम करणाऱ्या सरकारचा, परिणाम देणाऱ्या धोरणांचा आणि आत्मनिर्भर भारताचा ठोस दस्तऐवज आहे. अस्थिर जागतिक परिस्थितीतही भारताची आर्थिक वाटचाल भक्कम पायावर पुढे नेणारा हा अर्थसंकल्प ठरेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.शेवटी आमदार बबनराव लोणीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन करत हा अर्थसंकल्प देशाला मजबूत अर्थव्यवस्था, आत्मनिर्भरता आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने नेणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.






