
प्रतिनिधी | जालना
वृद्ध साहित्यिक कलावंत मानधन योजनेअंतर्गत बोगस व शासनाच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या कलावंतांची निवड करण्यात आल्याचा आरोप करत जालना जिल्ह्यातील वृद्ध साहित्यिक व शाहिरी कलावंतांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले होते.
सन २०२१-२२ ते २०२४-२५ या कालावधीतील वृद्ध साहित्यिक कलावंत मानधन योजनेत अनेक वर्षांपासून अर्ज सादर करूनही खऱ्या कलावंतांना डावलण्यात आल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. काही कलावंत गेल्या १५ ते २० वर्षांपासून मानधनासाठी प्रयत्नशील असून, त्यातील काहींचे निधनही झाले आहे. तरीही त्यांना न्याय मिळालेला नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली.

योजनेत निवड करताना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत, ५० वर्षांची वयोमर्यादा असतानाही कमी वयाच्या तसेच शासनाच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या बोगस व बनावट कलावंतांची निवड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे संपूर्ण आयुष्य कलाक्षेत्रात घालवून समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या खऱ्या कलावंतांवर अन्याय झाल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.
नोव्हेंबर २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेली निवड यादी तात्काळ रद्द करण्यात यावी, तसेच मानधन योजनेअंतर्गत निवड झालेल्या सर्व कलावंतांची सखोल चौकशी करून कोणत्या आधारावर व निकषांवर त्यांची निवड करण्यात आली, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा लोकशाही मार्गाने सुरू असलेले अमरण उपोषण अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला होता.

दरम्यान, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लेखी आश्वासन देत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून खऱ्या कलावंतांना न्याय देण्यात येईल, असे सांगितले. प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे हे अमरण उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले.या उपोषणात सविताताई पगारे, बाबुराव शाहीर राठोड, भाई पोपटराव पगारे यांच्यासह जालना जिल्ह्यातील सुमारे ४० ते ५० शाहिरी व साहित्यिक कलावंत उपस्थित होते.





