
सिंधी काळेगाव | प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणासोबतच व्यवहारिक ज्ञान,आत्मविश्वास आणि उद्योजकतेची ओळख मिळावी या उद्देशाने जि. प. के. प्राथमिक शाळा, सिंधी काळेगाव येथे 29 डिसे रोजी आनंदनगरी हा अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमात एकून ४० स्टॉल उभारण्यात आले होते. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवर्ग ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव शाळेत २९ रोजी या आनंदनगरी उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून विविध संकल्पनांवर आधारित एकूण 40 स्टॉल्स उभारले. खाद्यपदार्थ, हस्तकला, शैक्षणिक खेळ, विज्ञान प्रयोग, सेवा आधारित उपक्रम अशा विविध स्टॉल्समधून विद्यार्थ्यांनी व्यवहार, नियोजन, संवादकौशल्य आणि संघभावनेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या स्टॉल्सना पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते गजानन गिरान यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून व्यवहारिक ज्ञान तितकेच महत्त्वाचे आहे.आनंदनगरी सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जबाबदारी, नियोजन आणि उद्योजकतेची भावना विकसित होते. असे त्यांनी नमूद केले.पालक व गावकरी मंडळींनी उपक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शांताताई गजानन गिराम, उपाध्यक्ष सुभाष गिराम तसेच सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी सरपंच सुभाष गिराम, सामाजिक कार्यकर्ते गणेश गिराम, संजय गिराम, डॉ. जावेद पठान, सय्यद शौकत, अशोक जोगदंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक बबन बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवर्गाने उपक्रमाचे सुयोग्य नियोजन केले.







