प्रतिनिधी |जालना

मनुष्य जीवन जगत असताना समाजाचे ऋण प्रत्येकावर असते आणि त्यातून उतराई होण्यासाठी माणसाने समाजाची सेवा केलीच पाहिजे, असे प्रतिपादन हभप विठ्ठल महाराज राठोड यांनी रांजणीवाडी येथे झालेल्या काल्याच्या कीर्तनात केले. विठ्ठल-रुक्मिणी व महादेव मंदिर वर्धापनदिनानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. डॉ. हभप बळीराम(दादा) महाराज यादव यांच्या मार्गदर्शनात हा अखंड हरिनाम सप्ताह सात दिवस चालला. यामध्ये रामकथा आणि महाराष्ट्रातील दिग्गज मंडळींची कीर्तने झाली. काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची उत्साहात सांगता भ.प. झाली. हभप विठ्ठल महाराज राठोड यांनी आपल्या काल्याच्या कीर्तनात ‘परमार्थ करताना अहंकार नसावा’ या अभंगाच्या माध्यमातून परमार्थ आणि समाजसेवेचे महत्त्व पटवून दिले. परमार्थ करताना निष्काम भावनेने सेवा करावी, त्यात अहंकाराला स्थान नसावे, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. काल्याच्या कीर्तनानंतर पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
११






