शाम गिराम|सिंधीकाळेगाव– दिव्य मराठवाडा
विद्यार्थी दशेत असणाऱ्या लहान मुलांमध्ये मोबाईलचा वापर वाढला आहे. मुले मैदानी खेळ खेळण्याऐवजी तासनतास मोबाईलवर व्हिडिओ गेम खेळत आहेत. या कारणांमुळे शारीरिक व्यायाम होत नसल्याने मुलांचे वजन वाढत असून, इतर व्याधीही जडत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. आजच्या सोशल मीडियाच्या युगात मोबाईल हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे.

पुरुष असो की महिला तासनतास मोबाईलवर वेळ घालवत आहेत. साहाजिकच याचा प्रभाव मुलांवरही पडत आहे. पालकांना मोबाईल वापरताना पाहून मुलेही सतत मोबाईलवर खेळत आहेत. शिवाय काही पालकच मुलांना जेवताना व इतर वेळी शांत राहण्यासाठी सरळ मोबाईल हातात देत आहेत. मुलांचे शिक्षण असो की, खेळणे हे घरातच करण्यासाठी पालकांकडून भर दिला जात आहे. त्यातून साहजिकच मुलांच्या शारीरिक हालचाल कमी झाल्या आहेत. त्यातून पाठदुखीसह स्थूलतेशी निगडित तसेच रक्तदाब वाढणे, मधुमेह, हृदयाशी संबंधित आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. ते टाळून मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप, व्यायाम या त्रिसूत्रीनुसार पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. पालकांनी मोबाईल, लॅपटॉप , टीव्ही आदींवरील मुलांचा स्क्रीन टाईम कमी करावा, फास्ट फूडऐवजी त्यांना घरगुती आणि योग्य आहार द्यावा, दोरी उड्या, उठाबशा, रस्सीखेचीसह शालेय कवायतीमधील प्रकार मुलांकडून करून घ्यावे, मुलांना योगासने करण्यास प्रवृत्त करावे. मुलांचा मानसिक तणाव कमी करण्यासाठी पालकांनी त्यांच्याशी संवाद वाढविणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.






