
प्रतिनिधी |जालना
जालना शहरातील वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. महिला पोलिस अंमलदार कोमल काकडे, सिमा महाजन व पूजा सोनकांबळे यांनी गेल्या चार महिन्यांत एकूण २०९७ मोटार वाहन कायद्याअंतर्गत केसेस नोंदवत २२ लाख ५७ हजार ३५० रुपये दंड आकारला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मा. श्री. अजयकुमार बन्सल व अपर पोलिस अधीक्षक मा. श्री. आयुष नोपाणी यांच्या संकल्पनेतून जालना शहरातील महत्त्वाच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील सर्व घडामोडींवर पोलिस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षातून सतत नजर ठेवली जात आहे.नियंत्रण कक्ष जालना येथे उपविभागीय पोलिस अधिकारी मा. श्री. अनंत कुलकर्णी व शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस अंमलदारांकडून सातत्याने सीसीटीव्ही फुटेज तपासून नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे. प्रत्येक चौकातील हालचालींची नोंद घेऊन वरिष्ठांना माहिती दिली जात आहे.

१५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. श्रीमती पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर सप्टेंबर २०२५ पासून कारवाईला गती देण्यात आली. चार महिन्यांच्या कालावधीत नियमभंग करणाऱ्या वाहनांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करून मोठ्या प्रमाणावर दंड वसूल करण्यात आला आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षक यांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या या संकल्पनेमुळे वाहतूक विभागाला मोठे यश मिळाले असून, शहरातील वाहतूक शिस्त सुधारण्यास याचा सकारात्मक परिणाम होत असल्याचे चित्र आहे.






