सायरनच्या आवाजात अभ्यासाला सुरुवात; ‘एक भोंगा शिक्षणाचा’ उपक्रमाचा वाघरुळमध्ये शुभारंभ.

गिरीराज गिराम – मुख्य संपादक दिव्य मराठवाडा
जालना तालुक्यातील वाघरूळ येथील श्री रंगनाथ महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे ‘एक भोंगा शिक्षणाचा – चला करूया उत्सव परीक्षेचा’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद जालनाचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बाळासाहेब खरात आणि पंचायत समिती जालनाचे गटशिक्षणाधिकारी मनोज कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी केंद्रप्रमुख भागवत जेटेवाड, प्राचार्य उद्धव म्हस्के, सरपंच विलास खरात यांच्यासह शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे, शिक्षणाधिकारी खरात यांनी स्वतः वाघरूळ गावात भेट देऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास घरोघरी जाऊन पाहणी केली.

सायंकाळी सायरन वाजताच गावातील घराघरांमध्ये टीव्ही व मोबाईल बंद ठेवून सायंकाळी ७ ते १० या वेळेत विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्यात येतो. तसेच सकाळी ५ वाजता सायरन वाजल्यावर विद्यार्थी अभ्यासाला बसतात. यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार असून, ‘कॉपी’सारख्या अपप्रवृत्तींना आळा बसेल आणि गावाची एकूण शैक्षणिक गुणवत्ता उंचावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावर्षी कॉपीमुक्त परीक्षा यशस्वी करण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी पालकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
या उपक्रमास गावकरी, शिक्षक, सेवाभावी संस्था, भजनी मंडळ, पत्रकार बांधव तसेच विविध राजकीय प्रतिनिधींनी सहकार्याचे आश्वासन देत उपक्रमाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरेल, अशी सर्वसाधारण भावना उपस्थितांनी व्यक्त केली.







