
शाम गिराम| प्रतिनिधी
जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. या सणानिमित्त एकमेकांना तिळगूळ देत “तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला” अशा शुभेच्छा दिल्या जातात. मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो. या दिवशी भोगीची भाजी करण्याची परंपरा आहे.
संक्रांतीच्या दिवशी महिला हळदी-कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करतात. पूर्वी हळदी-कुंकवाच्या वाणामध्ये मातीचे सुगडे, हिरव्या बांगड्या, काळे मणी, जोडवे अशी सौभाग्य लेणी दिली जात असत. मात्र बदलत्या काळानुसार आता प्लास्टिक व स्टीलच्या वाट्या, प्लेट, चमचे, पावडरचे डबे, शॅम्पूची पाकिटे अशा दैनंदिन उपयोगाच्या वस्तू देण्याकडे महिलांचा कल वाढलेला दिसून येतो.

जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथे यंदाच्या मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकवाच्या वाणाला एक आगळा-वेगळा पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला. कृषीभूषण तथा मराठवाडा अध्यक्षा व्यापारी महासंघ सौ. सिताताई मोहिते यांनी “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश देत प्रत्येक सुवासिनीला हळदी-कुंकवाच्या वाणामध्ये एक झाडाचे रोप भेट दिले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून महिलांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण होत आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशोदाबाई गिराम, तुळसाबाई तायडे, लक्ष्मीबाई गिराम, पार्वताबाई गिराम, वर्षाताई तिडके, रेणुकाताई तायडे, रेखाताई तायडे, आश्विनीताई गिराम, कावेरीताई गिराम, अर्चनाताई उगले, कोमलताई मोहिते यांनी विशेष परिश्रम घेतले.
महिलांना वाण म्हणून झाडाचे रोप भेट
महिलांचा एकमेव आणि खास सण म्हणून ओळखला जाणारा मकर संक्रांतीचा सण नववर्षातील पहिला सण आहे. हिंदू धर्मात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महिला या दिवशी घरोघरी जाऊन हळदी-कुंकवाचे वाण देत “तिळगूळ घ्या, गोड गोड बोला” अशा शुभेच्छा देतात. याच परंपरेला पर्यावरणपूरक वळण देत झाडाचे रोप देण्याचा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
--.सिताताई रामभाऊ मोहिते
कृषीभूषण तथा मराठवाडा अध्यक्षा, व्यापारी महासंघ
अनुसया फळ रोप वाटिका, सिंधीकाळेगाव


