
प्रतिनिधी | जालना
पाचोड येथील शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पीएम उषा व आय.क्यू.ए.सी. तसेच मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘भाषांतर आणि अनुवाद’ या सर्टिफिकेट कोर्सचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास पैठण येथील ताराई महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. एकनाथ शिंदे म्हणाले की, “अनुवाद ही एक स्वतंत्र कला आहे. एखादी साहित्यकृती दुसऱ्या भाषेत प्रभावीपणे भाषांतरित करायची असल्यास त्या साहित्यकृतीतील सामाजिक, सांस्कृतिक तसेच भौगोलिक पार्श्वभूमीचा सखोल अभ्यास आवश्यक असतो. त्या अभ्यासानंतरच दर्जेदार अनुवाद शक्य होतो.” भाषांतरामुळे विविध भाषा, संस्कृती आणि समाज एकमेकांशी जोडले जातात, असेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे म्हणाले की, “आजच्या जागतिकीकरणाच्या युगात भाषांतराच्या कलेमुळे रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. साहित्य, प्रसारमाध्यमे, शैक्षणिक संस्था तसेच विविध देशांच्या दूतावासांमध्ये अनुवादकांना मोठी मागणी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात कौशल्य विकसित करावे.”

कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. संतोष चव्हाण यांनी केली. त्यांनी सर्टिफिकेट कोर्सचे उद्दिष्ट, अभ्यासक्रमाचे स्वरूप आणि विद्यार्थ्यांना मिळणारे शैक्षणिक व व्यावसायिक लाभ यांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनोद कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. भगवान जायभाय यांनी मानले.
या उद्घाटन सोहळ्यास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘भाषांतर आणि अनुवाद’ या सर्टिफिकेट कोर्समुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांना चालना मिळून त्यांना करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






