प्रतिनिधी |जालना
जालना–मंठा महामार्गावरील राममुर्ती फाट्यावर रविवारी सकाळी उस घेऊन जाणार्या चालत्या ट्रॅक्टरला दूधाचा पिकअप जोरात धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवितहानी टळली आहे. यामध्ये दोन्ही वाहनांचे विशेषतः दूधाच्या पिकअपचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार महामार्गावर वेगात येणाऱ्या पिकअप MH21BH5307 ने ट्रॅक्टरला मागून धडक दिली. धडकेचा आवाज दूरवरपर्यंत ऐकू गेला. अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. स्थानिक नागरिक व प्रवाशांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले व पिकअप मधील वाहनचालक सुरक्षित बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात नेले.







