दिव्य मराठवाडा नेटवर्क
जालना तालुक्यातील मौजे हातवन येथे दिनांक 05 डिसेंबर 2025 रोजी जागतिक मृदा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. तालुका कृषी अधिकारी विष्णू राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मंडळ कृषी अधिकारी शिवाजी कोरडे व उप कृषी अधिकारी एस. बी. ढगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात हातवन येथील सहाय्यक कृषी अधिकारी एस. एस. कमाने यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्व पटवून दिले. त्यांनी योग्य पोषणद्रव्याचे प्रमाण, पिकपद्धती, उत्पादन क्षमता वाढ आणि जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी माती परीक्षण हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले. जमिनीच्या सेंद्रिय घटकांचे संवर्धन, रासायनिक खतांचा योग्य वापर आणि नैसर्गिक शेतीस प्रोत्साहन देण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाला सरपंच गणेशराव धुमाळ, चेअरमन श्रीरंग शिराळे, सिताराम पिंपळे, साहेबराव शिंगाडे, मनोहर महाराज धुमाळ, काशिनाथ सोनगावकर, गजू धुमाळ, संभाजी शिराळे, मारुतीराव घोलप, उद्धव बारड, सोनू शिराळे यांच्यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, माहितीपर चर्चासत्र तसेच मृदा संवर्धनाबाबत प्रत्यक्ष सल्ला देऊन जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात आला.







