प्रतिनिधी|सिंधी काळेगाव
सिंधी काळेगाव येथील व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त सरस्वती पूजन व पाटीपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुरुचे महत्त्व आणि भारतीय संस्कृतीतील गुरुपरंपरेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
यावेळी “गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा मार्ग” या विचारावर आधारित विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली. आपल्या भाषणातून त्यांनी जीवनातील गुरुचे अनन्यसाधारण स्थान अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या पुंड यांनी केले. सिंधू घोलप, शारदा वानखेडे, नजीरा सय्यद आणि अर्चना पतंगे यांनी विद्यार्थ्यांना गुरुंचा सन्मान, शिक्षणाचे महत्त्व आणि संस्कार याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
शाळेचे संचालक महेश मुळे यांनी आपल्या जीवनातील एक प्रेरणादायी प्रसंग सांगत विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनासाठी परिश्रम, शिस्त आणि गुरुंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका आरती वानखेडे होत्या. त्यांनी सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमामुळे शाळेतील वातावरण भक्तिमय व प्रेरणादायी झाले असून विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.







