HomeNewsजालना रेशीम उद्योगाचे नवे केंद्र बनणार; ‘जालनाई’ ब्रँडचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

जालना रेशीम उद्योगाचे नवे केंद्र बनणार; ‘जालनाई’ ब्रँडचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

‘सिल्क, सीड आणि स्टील’ची ओळख कायम ठेवत जालना रेशीम उद्योगाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने वाटचाल

गिरीराज गिराम | जालना

जालना जिल्ह्याची ओळख आता ‘सिल्क, सीड आणि स्टील’ अर्थात ‘ट्रिपल एस सिटी’ म्हणून निर्माण होत असून, रेशीम उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळत आहे. जालन्यात रेशीम उद्योगाची संपूर्ण मूल्यसाखळी विकसित करून जिल्ह्याला देशातील महत्त्वाचे रेशीम केंद्र बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी जालना जिल्ह्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि कोनशिला अनावरण करण्यात आले. यामध्ये रेशीम कोष बाजारपेठेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण व कोनशिला अनावरण, अंबड पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे लोकार्पण तसेच सात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नवीन इमारतींचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी मंत्री पंकजा मुंडे, मंत्री संजय सावकारे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार हिकमत उढाण यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कापूस आणि सोयाबीन या पारंपरिक नगदी पिकांना पर्याय म्हणून रेशीम शेतीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही रेशीम शेतीतून चांगले उत्पन्न मिळण्याची संधी असून, अधिकाधिक शेतकऱ्यांना या व्यवसायाकडे वळविण्यासाठी प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची जोड देण्यात येईल.

पहिल्या लिलावाला उत्साहवर्धक प्रतिसाद

जालन्यात नव्याने सुरू झालेल्या रेशीम कोष बाजारपेठेमुळे उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या मालासाठी थेट बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. या बाजारपेठेतील पहिल्या लिलावाला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अधिकाधिक चांगला दर मिळावा, यासाठी व्यापारी आणि संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

‘जालनाई’ ब्रँडमधून जालना सिल्कची ओळख

रेशीम उत्पादनापुरते मर्यादित न राहता धागानिर्मिती, वस्त्रनिर्मिती, साडी विणकाम, ब्रँडिंग आणि बाजारपेठ अशी संपूर्ण मूल्यसाखळी जालन्यात विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. जालन्यातील महिलांनी रेशीमपासून साडी विणण्यास सुरुवात केली असून त्यांच्या कौशल्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

पैठणीला जशी स्वतंत्र ओळख मिळाली, त्याच धर्तीवर जालन्यात तयार होणाऱ्या रेशीम उत्पादनांना ‘जालनाई’ या स्वतंत्र ब्रँडने ओळख मिळवून देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. यावेळी ‘जालनाई’ ब्रँडच्या लोगोचे अनावरणही करण्यात आले. ‘जालना सिल्क’ला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा ब्रँड म्हणून विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

ड्रायपोर्टमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची संधी

जालना येथे ड्रायपोर्ट सुरू झाल्यामुळे रेशीम उत्पादनाला देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रेशीम बाजारपेठ आणि ड्रायपोर्ट या दोन्ही सुविधा जालना जिल्ह्याच्या रेशीम उद्योगाच्या विस्तारासाठी महत्त्वाच्या ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

रेशीम उद्योगाच्या विस्तारासाठी शेतकरी, महिला, विणकर, व्यापारी आणि युवकांना या संपूर्ण मूल्यसाखळीत सहभागी करून घेण्यावर भर दिला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया, गुणवत्ता, बाजारपेठ आणि मूल्यवर्धन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी डिजिटल माध्यमांचाही वापर केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular