प्रतिनिधी |जालना.
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी जालना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप पवार यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला.
आमदार लोणीकर यांनी सभागृहात जालना पंचायत समितीच्या विविध विकासकामे आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याच्या तक्रारींची चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, चौकशी पूर्ण होईपर्यंत गटविकास अधिकारी संदीप पवार यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली.
यावेळी ग्रामीण भागातील विकासकामे, रोजगार हमी योजना तसेच विविध आवास योजनांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे लोणीकर यांनी सभागृहात नमूद केले. शासकीय निधीचा योग्य वापर, पारदर्शकता आणि लाभार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशीही त्यांनी मागणी केली.







