HomeNewsसेवली येथे मोफत हृदय व नेत्र तपासणीसह उपचार शिबिराचे आयोजन.आ.बबनराव लोणीकर यांच्या...

सेवली येथे मोफत हृदय व नेत्र तपासणीसह उपचार शिबिराचे आयोजन.आ.बबनराव लोणीकर यांच्या हस्ते होणार शिबिराचे उद्घाटन

प्रतिनिधी|जालना

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर अंतर्गत कार्यरत जिजाई प्रतिष्ठान,सेवली व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग,लोकमान्य टिळक महाविद्यालय,सेवली यांच्या संयुक्त विद्यमाने सेवली येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.जिजाई प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ऍड.सुरेंद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर आयोजित करण्यात आले असून परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी ही मोठी आरोग्यसेवा ठरणार आहे .
या आरोग्य शिबिरात हृदय रोग तपासणी व प्राथमिक उपचार,नेत्र तपासणी,मोतीबिंदू निदान व मार्गदर्शन, ईसीजी (ECG), रक्तदाब (BP), शुगर तपासणी, तसेच विविध आजारांचे प्राथमिक निदान करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे तपासणीनंतर आवश्यकता भासल्यास मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहेत, ही या शिबिराची मोठी वैशिष्ट्ये आहेत.
या उपक्रमासाठी संजीवनी हॉस्पिटल, जालना,डॉ.एल.एच.हिरानंदानी हॉस्पिटल, पवई आणि श्री गणपती नेत्रालय,जालना या नामांकित वैद्यकीय संस्थांचे सहकार्य लाभले आहे. अनुभवी व तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांना मोफत सल्ला व तपासणी मिळणार असल्याने या शिबिराबाबत परिसरात मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. बबनरावजी लोणीकर साहेब (माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार, परतूर विधानसभा) यांच्या हस्ते होणार आहे. तर मा. राहुल मैय्या लोणीकर (भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. उकाजी जाधव (सचिव, जिजाई प्रतिष्ठान, सेवली) हे असतील. यावेळी मा. सौ. जिजाबाई जाधव (प्रदेश सचिव, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तथा अध्यक्षा, जिजाई प्रतिष्ठान, सेवली) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.हे मोफत आरोग्य शिबिर बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत लोकमान्य टिळक महाविद्यालय, सेवली (ता. जि. जालना) येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी दि. २७ जानेवारी २०२६ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत नोंदणी करणे अनिवार्य असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
शिबिरासाठी येणाऱ्या नागरिकांनी आधार कार्ड, रेशन कार्ड अथवा मतदान ओळखपत्र आणि मोबाईल नंबर सोबत आणावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. परिसरातील ग्रामीण व सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मोफत मिळावी, या उद्देशाने जिजाई प्रतिष्ठान व NSS विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे.

परिसरातील सर्व नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा व आपल्या कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिजाई प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, NSS स्वयंसेवक व लोकमान्य टिळक महाविद्यालय प्रशासन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular