HomeNewsसेवली येथे अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरू.

सेवली येथे अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरू.

तीन दिवसापासून उपोषण सुरू प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांचा आरोप.

प्रतिनिधी | जालना

जालना तालूक्यातील सेवली सर्कलमधील नागरिकांच्या न्याय्य हक्कासाठी सेवली येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेले बेमुदत उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरू असून, अद्याप शासनाचा एकही वरिष्ठ अधिकारी उपोषणस्थळी भेट देण्यासाठी आलेला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की,सेवली येथे अप्पर तहसील कार्यालय होणे हा येथील नागरिकांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. सेवली हे प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असून येथे मोठी जिल्हा परिषद शाळा, पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना तसेच अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत. याशिवाय निजामकालीन काळात सेवली येथे तहसील कार्यालय अस्तित्वात होते. त्यामुळे सेवलीचा हा ऐतिहासिक आणि न्याय्य अधिकार हिरावून घेऊ नये, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.या बेमुदत उपोषणात सतीश डुमे, प्रमेश्वर गाडेकर, प्रल्हाद पालवे, गणेश मोरे, तानाजी सुतार, विजय सदावर्ते यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले आहेत. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही शासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.यावेळी ग्रामपंचायत सोनदेव धारा चे सरपंच गजानन ढाकणे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.यावेळी उपोषनकरत्यांनी शासनाने विलंब न करता सेवली येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करून नागरिकांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी केली.

सेवली येथे अप्पर तहसील कार्यालय होणे हा येथील जनतेचा न्याय्य आणि जन्मसिद्ध अधिकार आहे. सेवली हे अनेक शासकीय कार्यालयांचे केंद्र असून ऐतिहासिकदृष्ट्याही या ठिकाणी तहसील कार्यालय अस्तित्वात होते. तरीही शासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. सलग तीन दिवस नागरिक उपोषणावर बसले असतानाही एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने भेट न देणे ही लोकशाहीला शोभणारी बाब नाही. शासनाने तात्काळ या आंदोलनाची दखल घेऊन सेवली येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करावे. ही केवळ सेवलीची नव्हे, तर संपूर्ण परिसरातील जनतेच्या न्याय, विकास आणि प्रशासकीय सोयीची मागणी आहे. या लढ्यात मी आणि ग्रामपंचायत सोनदेव धारा कायम जनतेसोबत आहोत .
~~गजानन ढाकणे-सरपंच सोनदेव 

RELATED ARTICLES

Most Popular