
गिरीराज गिराम-मुख्य संपादक दिव्य मराठवाडा
चित्रपट, ओटीटी आणि टीव्ही या तीनही माध्यमांचे प्रेक्षकवर्ग, आर्थिक गणित व मर्यादा वेगवेगळ्या आहेत. अनेक कलाकारांकडे गुणवत्ता असूनही संधी मिळत नाही. अशा पार्श्वभूमीवर युट्यूब मालिका हे एक प्रभावी आणि खुले व्यासपीठ ठरणार असून ‘तुझ्याचसाठी – एक मन विखुरलेलं’ या मालिकेमुळे मराठी कलाविश्वाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केला.
पुणे येथील श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित भव्य कार्यक्रमात ‘तुझ्याचसाठी – एक मन विखुरलेलं’ या पहिल्या मराठी युट्यूब मालिकेचा लॉन्च सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी राजेभोसले बोलत होते.
याप्रसंगी प्रसिद्ध गायक साजन बेंद्रे, सुप्रसिद्ध अभिनेते शिवभक्त सचिन गवळी, मालिकेचे निर्माते सर्जेराव गायकवाड व राम पाटील, दिग्दर्शक ओंकार नागनाथ पिंपळे यांच्यासह मालिकेतील सर्व कलाकार व तंत्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना मेघराज राजेभोसले म्हणाले, मराठी मनोरंजन क्षेत्रात गुणवंत कलाकारांची कमतरता नाही. मात्र माध्यमांच्या मर्यादांमुळे सर्वांना संधी मिळतेच असे नाही. युट्यूबसारख्या डिजिटल माध्यमातून कलाकारांना खुले व्यासपीठ मिळणार आहे. निर्मात्यांचे आर्थिक गणित जुळणेही तितकेच महत्त्वाचे असून, या मालिकेच्या माध्यमातून ते यशस्वीपणे साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मालिकेच्या संकल्पनेचे कौतुक करत ही मालिका मराठी डिजिटल मनोरंजन क्षेत्रातील मैलाचा दगड ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी साजन बेंद्रे, सचिन गवळी, सर्जेराव गायकवाड, राम पाटील आणि दिग्दर्शक ओंकार नागनाथ पिंपळे यांनी आपल्या मनोगतातून मालिकेच्या निर्मितीमागील भूमिका, संघर्ष आणि उद्देश मांडले.
‘तुझ्याचसाठी – एक मन विखुरलेलं’ ही पहिली मराठी युट्यूब मालिका ९ फेब्रुवारीपासून सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर सोनवणे यांनी केले.
निर्माता राम पाटील मुळे
जालना जिल्ह्याचा गौरव .
या मालिकेचे सहनिर्माते जालना तालूक्यातील रामनगर येथील युवक राम पाटील यांनी आपल्या व्यावसायिक वाटचालीसोबत कला जोपासण्याचा आदर्श निर्माण केला आहे. पँथेलोजी (Panthelology) या व्यवसायात कार्यरत असतानाच त्यांनी मराठी कला, कलाकार आणि नव्या माध्यमाला संधी देण्यासाठी पुढाकार घेतला. व्यवसाय आणि कला यांचा समतोल साधत त्यांनी निर्मिती क्षेत्रात उडी घेतली असून, त्यांचे हे योगदान अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.






