
प्रतिनिधी|जालना
जालना शहरातील नूतन वसाहत भागात झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणात कदीम जालना पोलिसांनी जलद कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. शुक्रवारी रात्री सुमारे 8.30 वाजता जिल्हा रुग्णालय रस्त्यावर स्कुटीवरून आलेल्या दोन इसमांनी चरण रायमल (वय 27) याच्यावर गावठी पिस्तूलातून गोळीबार केला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या चरण रायमल याचा खासगी रुग्णालयात नेत असतानाच रस्त्यातच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्धन शेवाळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या शोधासाठी तातडीने विविध पथके तयार करण्यात आली.
दरम्यान, शनिवारी पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास अंबड रोडवरील काजळा फाटा परिसरात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयितांचा पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अजय विजय आमलेकर व अमन शैलेंद्र धिल्लोड (दोघेही रा. मातोश्री लॉन नजीक, जालना) अशी आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक जनार्धन शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार सदा राठोड, नंदकिशोर टेकाळे, शेख मतीन, आशपाक शाह आदींच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली. पुढील तपास सुरू असून गुन्ह्याचे नेमके कारण शोधले जात आहे.



